एनआरसीच्या माजी महिला अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

गुवाहाटी : आसामच्या नागरिकत्वाबाबतची अद्ययावत माहिती (डेटा) संबंधित संकेतस्थळावरून नाहीशी झाल्यानंतर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. नोकरी सोडताना या संवेदनशील दस्ताऐवजाचा पासवर्ड सादर करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या महिला अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे.

एनआरसीच्या माजी महिला अधिकाऱ्याला लेखी स्मरणपत्रे दिल्यानंतरही तिने या दस्ताऐवजाचा पासवर्ड न दिल्यामुळे तिच्याविरुद्ध ‘ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट’ अन्वये पलटण बझार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे, असे एनआरसीचे राज्य समन्वयक हितेश देव शर्मा यांनी पीटीआयला सांगितले.

‘गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला राजीनामा दिल्यानंतरही या महिलेने पासवर्ड सोपवला नाही. कंत्राटी कर्मचारी असलेल्या या महिलेला नोकरी सोडल्यानंतर पासवर्ड स्वत:जवळ ठेवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे गोपनीयता कायद्याचा भंग केल्याबद्दल तिच्याविरुद्ध बुधवारी एफआयआर नोंदवण्यात आला’, असे ते म्हणाले.

पासवर्ड सादर करण्यासाठी एनआरसी कार्यालयाने तिला अनेकदा पत्रे लिहिली, मात्र त्यावर काही प्रतिसाद मिळाला नाही असेही शर्मा यांनी सांगितले.

नोकरी सोडल्यानंतर या महिला अधिकाऱ्याने संवेदनशील माहितीत फेरफार केला काय, हे जाणून घेणे आमच्यासाठी आवश्यक आहे असे सांगतानाच, या प्रकरणी काही ‘गैर हेतू’ असल्याचा आरोप शर्मा यांनी अमान्य केला.

आसाम एनआरसीचे माजी समन्वयक प्रतीक हजेला यांनी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एनआरसीच्या अंतिम यादीत फेरफार केल्याचा आरोप आसाम पब्लिक वर्क्‍स (एपीडब्ल्यू) या स्वयंसेवी संस्थेने बुधवारी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात नोंदवलेल्या आणखी एका एफआयआरमध्ये केला आहे.