आसाम सरकारने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या (एनआरसी) ड्राफ्टमध्ये सूट मिळालेल्या १ लाखांहून अधिक लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ३० जुलै २०१८ रोजी समाविष्ट असलेली ती नावे आहेत जी नंतर या यादीत समाविष्ट करण्यास अयोग्य ठरली होती. मात्र, आता या लोकांना आपली नागरिकता सिद्ध करण्यासाठी दावा दाखल करता येणार आहे. आसामच्या सर्बानंद सोनोवाल सरकारने १ लाख २ हजार ४६२ लोकांची अतिरिक्त यादी जाहीर केली आहे. यापूर्वी गेल्यावर्षी एनआरसीचा अंतिम मसूदा प्रसिद्ध झाल्यानंतर मोठा राजकीय वाद पहायला मिळाला होता. यामध्ये राज्यातील ४० लाख लोकांच्या नावांचा समावेश नव्हता.

शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, यादीत त्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. जे दावे आणि आक्षेपांच्या निपटाऱ्यांसाठी आयोजीत सुनावणीदरम्यान अपात्र ठरले होते. ज्या लोकांना या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे, त्यांना व्यक्तीगतरित्या त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवलेल्या पत्राद्वारे सूचना दिली जाणार आहे. तसेच अशा व्यक्तींना ११ जुलै रोजी संबंधीत एनआरसी सेवा केंद्रांवर आपले दावे दाखल करण्याची संधीही मिळणार आहे.

सरकारच्यावतीने जाहिरातीत सांगण्यात आले होते की, ३१ जुलै रोजी एनआरसीच्या अंतिम प्रकाशनापूर्वी त्यांचे दावे सोडवले जातील. त्यानंतर नवी यादी एनआरसी सेवा केंद्रात प्रकाशित केली जाईल. ऑनलाइनही ही यादी उपलब्ध असेल.

३० जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या एनआरसी ड्राफ्टमध्ये एकूण ३.२९ कोटी अर्जांपैकी २.९ कोटी लोकांच्या नावांचा समावेश होता. तर, ४० लाख लोकांना यातून वगळण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री प्रकाशित करण्यात आलेल्या पहिल्या ड्राफ्टमध्ये १.९ कोटी नावे होती. सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणाखाली आसाममध्ये एनआरसी अद्ययावत करण्यात येत आहे. त्यानंतर अंतिम यादी ३१ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.