आसाम रायफल्सच्या जवानांनी बुधवारी दोन महिलांकडून १६६७ ग्रॅम वजनाचे व तब्बल १० कोटी रुपये किंमतीचे कच्चे हिरे हस्तगत केले आहेत. दक्षिण आसामच्या हैलाकंदी जिल्ह्यातून या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, आसाम रायफल्सच्या जवानांनी हैलाकंदी शहारापासून ९ किलोमीटर अंतरावरील मोनचेरा येथे एका रिक्षाचा शोध घेत असताना, या दोन महिलांच्या पिशवीतून हे कच्चे हिरे जप्त केले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही महिलांची ओळख पटली असुन मोनिया संगमा आणि मिनाती संगमा अशी त्यांची नावं आहेत, या दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे.आसाम रायफल्सच्या जवानांनी या दोघींना व जप्त करण्यात आलेले हिरे लाला पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

याप्रकरणी या महिलांची चौकशी केली असता मोनिया हिने सांगितले की, हे मौल्यवान खडे तिला तिच्या चुलत भावाने बाजारपेठेत विक्रीसाठी दिले होते. तो मेघालयातील एका कोळसा खाणीत काम करतो. ती हे हिरे एका ग्राहकास देण्यासाठी चालली होती.