फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आसाममधील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. सिलचर येथील गुरचरण कॉलेजात शिक्षकावर ही कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य तसंच सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात शिक्षक सौरदीप सेनगुप्ता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कॉलेजच्या एकूण १० विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरदीप यांनी हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करत जातीय हिंसा भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. सौरदीप गेल्या एक वर्षापासून कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवत होते. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी दिल्लीत २००२ गोध्रा दंगलीच्या पुनरावृत्तीचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं होतं. ही पोस्ट सध्या डिलीट करण्यात आली आहे.

टीका होऊ लागल्यानंतर सौरदीप यांनी फेसबुक पोस्ट डिलीट करत धार्मिक भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली. कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही गुरुवारी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं.

पण शुक्रवारी विद्यार्थ्यांनी सौरदीप यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तसंच कॉलेज प्रशासनाकडे तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी अशी विनंती केली. रोहित चंदा या विद्यार्थ्याने सांगितल्यानुसार, “एखादा शिक्षक धर्माचा अपमान कसा काय करु शकतो ? त्यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही आक्षेपार्ह शब्द वापरले. दोन वेळा ते पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. त्यांचा अपमान कसा केला जाऊ शकतो ?”

सौरदीप यांनी शनिवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी जवळपास ४० विद्यार्थी त्यांच्या घराबाहेर जमले होते आणि माफी मागण्याची मागणी करत होते. या सर्व प्रकारामुळे आम्ही प्रचंड घाबरलो होते. विद्यार्थी यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत होते.

सौरदीप यांच्या बहिणीने सांगितल्यानुसार, “भीतीपोटी आम्ही पोलीस संरक्षण यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता आमची मदत करण्याऐवजी त्यांनी सौरदीपला अटक केली. त्यांनी एफआयआर दाखल झाल्याचं आम्हाला काही सांगितलंही नाही. हे स्वीकारलं जाऊ शकत नाही”.