मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून आसाममध्ये जमावाने तीन साधूंना मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. आसाम रायफल्सच्या जवानांनी सतर्कता दाखवत वेळीच हस्तक्षेप केला आणि या तीन साधूंची सुटका झाली.

आसाममधील दिमा हसाओ येथील माहूर गावात गुरुवारी तीन साधू पोहोचले. मात्र, ते तिघे मुले पळवणारी टोळीचे सदस्य असल्याचा संशय स्थानिकांना आला. स्थानिकांनी त्यांची चौकशी केली. काही वेळात तिथे जमाव जमला आणि त्यांनी साधूंना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीची घटना काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. हा प्रकार आसाम रायफल्सच्या जवानांना समजला. त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही साधूंची सुटका केली.

घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यातील विविध समाजातील प्रतिनिधींची बैठक घेतली. नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, देशभरात मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून मारहाणीचे सत्र सुरुच आहे. देशभरात गेल्या वर्षभरात जमावाने केलेल्या मारहाणीत २७ जणांना जीव गमवावा लागला. मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियावरुन पसरवल्या जात असून या अफवांवर लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

बुधवारी नागपूर जिल्ह्यातील करभांड गावात किडनीचोर समजून तीनशे ते चारशे लोकांच्या जमावाने एका महिलेला मारहाण केली होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच हस्तक्षेप केल्याने त्या महिलेची सुटका करण्यात यश आले.