आसाममधील कोक्राझार आणि बक्सा या जिल्ह्य़ांत स्थलांतरितांवरील हल्ले सुरूच असून शनिवारी आणखी नऊ मृतदेह आढळून आले. त्यामुळे या हिंसाचारात आतापर्यंत बळी बडलेल्यांची संख्या ३२ झाली आहे. दरम्यान, या सर्व हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्य़ांतील हजारो स्थलांतरितांनी पलायन केले आहे.
कोक्राझार आणि बक्सा हे दोन्ही जिल्हे भूतान आणि बांगलादेश या देशांच्या सीमावर्ती भागात आहेत. या दोन्ही जिल्ह्य़ांत सातत्याने घुसखोरी होत असते.
या घुसखोरीला येथील स्थानिक बोडो आदिवासींनी कायमच विरोध केला आहे. त्यामुळे येथे सातत्याने स्थलांतरितांना लक्ष्य केले जात असते. गुरुवारपासून सुरू झालेला हिंसाचार हा त्याचाच भाग आहे.
गेल्या दोन दिवसांत या दोन्ही जिल्ह्य़ांतील गावांत नॅशनल डेमॉक्रॅटिक बोडोलँड फ्रंट (सोंगजित) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी स्थलांतरितांवर बेछूट गोळीबार करण्याचे सत्र चालवले आहे. त्यात आतापर्यंत ३२ जणांचा बळी गेला आहे.
दरम्यान, हिंसाचारामुळे दहशतीच्या सावटाखाली या दोन्ही जिल्ह्य़ांतील सुमारे पाच हजार स्थलांतरितांनी येथून पलायन केले असल्याचे समजते.
या सर्व हिंसाचाराच्या घटनांची दखल घेत आसाम सरकारने याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, तर सुरक्षा दलांनी आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे.
बोडोंकडून इन्कार
कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्य़ात उसळलेल्या हिंसाचारात आपल्या संघटनेचा कोणताही हात नसल्याचे नॅशनल डेमॉक्रॅटिक बोडोलँड फ्रंटचे सचिव एन. ई. इसारा यांनी स्पष्ट केले आहे. आसाम सरकारने हिंसाचार घटनांचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.