आसामच्या हिंसाचारग्रस्त परिसरात लष्कराने आपली कारवाई अधिक तीव्र केली असून, बाधित क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आणि घुसखोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आसाममध्ये बोडो फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८१ जण ठार झाले आहेत.
लष्कराने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या सांकेतिक नावाने कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिले असले, तरी अशा प्रकारची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
लष्करातील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कोणत्याही स्थितीला तितक्याच आक्रमकपणे सामोरे जाण्यासाठी आढावा घेण्यात येत आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाधित परिसराची हवाई पाहणीही केली जात आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी लष्कर नागरी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करीत आहे, असेही प्रवक्ता म्हणाला.
कोक्राझार, चिरंग, सोनितपूर आणि उदलगुगी हे चार जिल्हे सर्वाधिक बाधित असून, तेथील जवळपास ७५ हजार नागरिकांनी ६१ मदतकार्य छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. विविध संघटनांनी पुकारलेल्या १२ तासांच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी राज्याच्या कोणत्याही भागात अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त आलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.