आसाममध्ये सर्वसामान्य आदिवासींवर हल्ला करून तब्बल ७८ जणांची हत्या करणाऱ्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) या संघटनेविरोधात केंद्र सरकार कठोर पावले उचलणार आहेत, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिले. या संघटनेचा नायनाट करण्यासाठी भूतानने भारताला मदत करावी, अशी मागणीही गृहमंत्र्यांकडून करण्यात आली. एनडीएफबी संघटनेसारख्याच कट्टरतावादी असलेल्या उल्फा संघटनेचा बीमोड करण्यासाठी भूतानने मदत केली होती, असेही त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी हल्ले  झालेल्या सोनितपूर जिल्ह्याला भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली. बोडो दहशतवाद्यांचा बीमोड करणे गरजेचे असून, केंद्र सरकारच्या ‘शून्य सहिष्णुता’ धोरणानुसार या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार याप्रकरणी गंभीर असून, एनडीएफबी संघटनेविरोधात कारवाई करण्याची तयारीही सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भूतानची मदत
भारत-भूतान सीमेवरील जंगलात बोडो दहशतवाद्यांचे बस्तान असून, त्यांचा बीमोड करण्यासाठी भूतान सरकारची मदत घेतली जाणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी याप्रकरणी सविस्तर चर्चा केली. स्वराज लवकरच भूतान सरकारशी चर्चा करणार असून, त्यांच्याकडे मदतीची मागणी करणार आहेत. २००३-०४मध्ये भूतान सरकारने उल्फा संघटनेविरोधात मोहीम सुरू केली होती आणि त्यामुळे या देशातून या संघटनेचा नायनाट झाला.
बोडो दहशतवाद्यांचे आसाममधील हल्लासत्र सुरूच असून, गुरुवारीही काही भागांत हल्ले करण्यात आले. कोक्राझार जिल्ह्य़ातील गॉस्साईगाव येथे सकाळी काही घरांवर हल्ले करण्यात आले. काही घरांना आगही लावण्यात आली होती. आसाममधील बोडो दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांची संख्या आता ७८ झाली आहे. गुरुवारी सोनितपूर येथे आणखी सहा मृतदेह सापडले.

लष्कर आसाममध्ये
गुवाहाटी : आसाममध्ये ७८ जणांची नृशंस हत्याकांड करणाऱ्या ‘एनडीएफबी’ या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्यासाठी लष्कराच्या तुकडय़ा आसाममध्ये दाखल झाल्या आहेत. भूतान आणि अरुणाचल प्रदेश येथील जंगलामध्ये बोडो दहशतवादी दडून बसले असल्याने लष्कराच्या हेलिकॉप्टरने या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.