अमित शहांची टिप्पणी; मोदी हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचीही स्तुतिसुमने

उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये मिळविलेले ऐतिहासिक यश ही काही साधीसुधी घटना नाही. तिचे परिणाम दूरगामी असतील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील गोरगरीब जनतेमध्ये निर्माण झालेल्या घट्ट आणि अतूट नात्यामुळे शक्य झाले असल्याची टिप्पणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. मोदी स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याची स्तुतिसुमनेही त्यांनी उधळली. गोवा आणि मणिपूरमध्येही सत्ता स्थापन करण्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाबद्दल बोलण्याचे टाळले.

लागोपाठ दुसऱ्यांदा देशातील सर्वाधिक मोठे राज्य जिंकणारे शहा ‘११, अशोका रोड’ या मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. एरव्ही तिखट बोलणाऱ्या आणि कधीकधी तुसडेपणा दाखविणाऱ्या शहांचा शनिवारचा मूड मात्र एकदम प्रसन्न होता. त्यांची देहबोली एकदम तणावरहित होती. कमालीचा आत्मविश्वास झळकत होता. पत्रकारांच्या प्रश्नाला ते लीलया टोलवत होते. हसतखेळत उत्तर देत होते. चिमटे काढत होते आणि स्वभावानुसार अधूनमधून तिखट बोलायचे विसरलेसुद्धा नाहीत.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एवढे विलक्षण यश कोणालाही मिळाले नाही. मोदी हेच आतापर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे आता सिद्ध झाले आहे, असा दावा करून ते म्हणाले, ‘आजपर्यंत गरिबांच्या तोंडाला फक्त पाने पुसली. पण मोदी त्यांच्यासाठी अथक काम करताहेत. म्हणून तर ते गरिबांच्या आशेचा किरण बनलेत. वीज, घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस, बँकेमध्ये खाते या तुम्हाला दिल्लीत बसून छोटय़ा, किरकोळ गोष्टी वाटतील. पण गरिबांसाठी त्यांचे मोल मोठे असते. मोदींनी ते केले असे शहा म्हणाले.

मुख्यालयात होळी व दिवाळी

उत्तर प्रदेशमधील अभूतपूर्व यशानंतर ‘११, अशोका रोड’ या मुख्यालयातील वातावरण एकदम उल्हसित होते. कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या, भारतमातेचा जयजयकार करीत होत्या, जागोजागी मिठाई वाटली जात होती. शहांच्या आगमनानंतर गर्दीची घोषणाबाजी शिगेला पोचली. मोदी आज (रविवार) सायंकाळी सहा वाजता मुख्यालयात येणार आहेत.

शहा म्हणाले..

  • जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण यांच्याविरुद्ध दिलेला हा कौल आहे. यापुढील राजकारण कामगिरीवर आधारलेले (पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स) असेल.
  • मतदार हा काही हिंदू-मुस्लीम नसतो. प्रत्येकाला विकास हवाय. प्रत्येक चांगले सरकार हवेय. उत्तर प्रदेशची जनता हिंदू-मुस्लीम या दुंभगलेल्या मन:स्थितीतून बाहेर पडलीय. आता तुम्हीसुद्धा (माध्यमे) बाहेर पडा..
  • अमेठी व रायबरेली या गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघातील दहापैकी सहा जागा भाजपने जिंकल्यात. हे खूप महत्त्वाचे आहे.