• उत्तर प्रदेशात भाजपचा ऐतिहासिक विजय, उत्तराखंडही ताब्यात पंजाब काँग्रेसकडे; गोवा, मणिपूरमध्ये रस्सीखेच
  • सप, बसप, आपची धुळधाण

दोन वर्षांनी, सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचा मोठा टप्पा ठरलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या दोन राज्यांत ऐतिहासिक असा खणखणीत  विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने तेथे सत्ताबदल घडवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो रंगा’त ही दोन्ही राज्ये रंगल्याचे ऐन होळीच्या आदल्या दिवशी स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षातील बेदिली, निष्प्रभ ठरलेली काँग्रेस व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे याच राज्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा या घटकांमुळे अवाढव्य अशा उत्तर प्रदेशातील ४०३ पैकी तब्बल ३१२ जागी भाजपचे कमळ फुलले आहे. तर, उत्तराखंडातील ७०पैकी ५७ जागा पटकावीत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला पुरते चितपट केले आहे. पंजाबमधील अकाली दल-भाजप आघाडीच्या सत्तेचे संस्थान मात्र काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली खालसा केले आहे. ४० आमदारांच्या गोव्यात आणि ७० आमदारांच्या मणिपूरमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी बहुमताचा आकडा या पक्षास गाठता न आल्याने काँग्रेस व भाजप यांच्यात सत्तेसाठी कमालीची रस्सीखेच सुरू झाली आहे.

bjp-win-chart

समाजातील सर्व स्तरातून

भाजपला मिळत असलेल्या पाठिंब्याने कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे. या यशाचे श्रेय जनतेला आणि अर्थातच विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना जाते. आमचा प्रत्येक क्षण, आमचे प्रत्येक कार्य जनतेच्या हितासाठीच असेल. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी पुन्हा एकदा आभार. सव्वाशे कोटी भारतीयांच्या जनशक्तीवर आमचा प्रचंड विश्वास आहे.

नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान

उत्तर प्रदेशातील भाजपचा विजय म्हणजे एखाद्या लहानशा तलावातील तरंग नसून ‘सुनामी’च आहे.  विरोधी पक्षांनी आता २०१९ विसरून २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारी सुरू करावी. मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा संपूर्ण देशात स्वीकारार्हता असलेला कुणीही नेता आज नाही. विरोधी पक्षांनी आता केवळ टीका करण्याचे धोरण बदलून सकारात्मक पर्याय देण्याची गरज आहे.

ओमर अब्दुल्ला