बिहार विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर पुढच्या वर्षभरात आणखी पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम बघायला मिळणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकी अटीतटीची झाली. त्याचबरोबर राजकीय पक्षांचं प्रदर्शनही दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे भाजपा लक्षवेधी कामगिरी करत दुसऱ्या क्रमांकांच्या जागा जिंकल्या. त्यामुळे आगामी काळात पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचं प्रदर्शन कसं राहणार हे पाहणंही महत्त्वपूर्ण असणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत तीव्र राजकीय लढाई बघायला मिळाली. पण, बिहारपेक्षाही जास्त राजकीय संघर्ष पश्चिम बंगालमध्ये मिळू शकतो. तिथे निवडणुकीचे पडसाद आतापासून उमटायला लागले आहेत. पश्चिम बंगालसह देशभरातील पाच राज्यांमध्ये अटीतटीच्या राजकीय लढाया बघायला मिळू शकतात.

पश्चिम बंगाल…

पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरूवातीला होण्याची शक्यता आहे. २९४ जागांसाठी निवडणूक होणार असून, २०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं २११ जागा जिंकत सरकार स्थापन केलं होतं. गेल्या दहा वर्षांपासून बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असून, आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याची तयारी भाजपाकडून सुरू आहे. तृणमूल व भाजपातील संघर्ष वाढताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष असणार आहे.

आसाम…

आसाममधील सत्ता सध्या एनडीएकडे आहे. भाजपाचे सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री असून, पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आसाम विधानसभेची सदस्यसंख्या १२६ असून, मागील निवडणुकीत भाजपानं ६० जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ २६ जागाच मिळाल्या होत्या.

केरळ…

पश्चिम बंगालबरोबरच केरळमध्येही भाजपाकडून पाय रोवण्याचे प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. त्यातूनच राजकीय संघर्षही झाल्याचंही दिसून आलं आहे. सध्या केरळमधील सत्ता सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडीकडे (एलडीएफ) आहे. एलडीएफने २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत ९१ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला खातंही उघडता आले नव्हते.

तामिळनाडू…

तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी सुरूवातीला म्हणजे मे मध्ये विधानसभा निवडणूक होऊ शकते. तामिळनाडूतील सत्तासुत्रे सध्या अण्णा द्रमुककडे आहे. मागील दहा वर्षांपासून अण्णा द्रमुक सत्तेत आहेत. २०१६च्या निवडणुकीत अण्णाद्रमुकनं २३४ पैकी १३६ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला पायही ठेवता आला नाही.

पाँडिचेरी…

पाँडिचेरी मोठं राज्य नसलं तरी काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या नजरा या राज्याकडे आहे. पाँडिचेरीतील सत्ता काँग्रेसकडे आहे. काँग्रेसनं १५ जागा जिंकल्या होत्या. तर ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसनं आठ जागा जिंकल्या होत्या.