राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोन राज्यांमध्ये काँग्रेस, भाजप आणि टीआरएस या तीन पक्षांमध्ये जोरदार प्रचारयुद्ध रंगले होते. राजस्थानमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत २१.८९ टक्के मतदान झाले आहे. तेलंगणमध्ये ११९ तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे.

राजस्थानात दर पाचवर्षांनी सत्ता बदल होत असतो. इथल्या जनतेने नेहमीच काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना आलटून-पालटून संधी दिली आहे. तेलंगणमध्ये २.८० कोटी नागरिकांकडे मतदानाचा अधिकार आहे. राज्यात एकूण ३२,८१५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. राजस्थानात १९९ जागांसाठी २,२७४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५१,६६७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

राजस्थानात ४.७४ कोटी लोकांकडे मतदानाचा अधिकार आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने इथे १६३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. राजस्थानात दर पाचवर्षांनी प्रस्थापित सरकार विरोधात एक लाट असते. ती रोखण्याचे मुख्य आव्हान वसुंधरा राजेंसमोर आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि भाजपा दोघांनी परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. राजस्थानात मतदारांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. पाच राज्यांच्या या विधानसभा निवडणुकांकडे आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहेत.