22 February 2019

News Flash

जाणून घ्या कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री

संग्रहित छायाचित्र

भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अव्वल स्थानी असून त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्याकडे फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री आहेत.

देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. माणिक सरकार यांच्याकडे फक्त २६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे ३० लाख रुपयांची आणि जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे ५५ लाख रुपयांची संपत्ती आहे. देशातील १९ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तर ५५ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती १ कोटी ते १० कोटी रुपयांदरम्यान आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे १७७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे १२९ कोटी रुपयांची तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर ४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे एडीआरच्या पाहणीतून समोर आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे (२२) दाखल आहेत. यात तीन गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. ३१ पैकी २० मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असून आठ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६ टक्के मुख्यमंत्री हे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी.के. चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे.

First Published on February 13, 2018 9:23 am

Web Title: association of democratic reform analysis richest poorest cm of india highest number of cases on cm devendra fadnavis