एक लघुग्रह या आठवडय़ात पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून, त्यामुळे काही संदेशवहन उपग्रहांच्या कार्यात अडथळे येण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा लघुग्रह ४५.७ मीटर रुंद असून तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता मात्र नाही. हा लघुग्रह शंभराहून अधिक  संदेशवहन व हवामान उपग्रहांपैकी कुठल्याही उपग्रहावर आदळणार नाही, पण त्यांच्या कार्यात अडथळे मात्र निर्माण होऊ शकतात. वर्षभरापूर्वी २०१२ डीए १४ या लघुग्रहाचा शोध लागलेला असून त्याच्यावर वैज्ञानिकांनी बारीक लक्ष ठेवले आहे. हा लघुग्रह शुक्रवारी पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असून, त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर २७६८१ कि.मी. असेल. हे अंतर बरेच जास्त असले तरी खगोलशास्त्रीयदृष्टय़ा बऱ्यापैकी धोकादायक मानले जाते. कुठलाही लघुग्रह पृथ्वीच्या इतका जवळून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठाचे डॉ. डॅन ब्राऊन यांनी सांगितले, की आपले मोबाईल फोन व उपग्रह यांच्यादरम्यान माहितीची देवाणघेवाण होते, त्यात यामुळे अडथळा येऊ शकतो. हा लघुग्रह ताशी वीस ते तीस हजार किलोमीटर वेगाने म्हणजे रायफल बुलेट इतक्या वेगाने भूस्थिर उपग्रहांच्या कक्षेतून जाणार आहे. भूस्थिर उपग्रह हे पृथ्वीपासून ३५,४०६ कि.मी. इतक्या उंचीवर असतात. याच उपग्रहांच्या मार्फत आपल्याला दूरसंचार सेवा चालवता येते तसेच हवामानाचीही माहिती मिळत असते. हा लघुग्रह अंतराळ कचऱ्याला धडकण्याची शक्यता आहे, पण तो उपग्रहावर आदळला तर ते दुर्दैव असेल. हा लघुग्रह पृथ्वीवरून द्विनेत्रीतून पाहिल्यास एक ठिपका आकाशातून आडवा जाताना दिसणार आहे.