गुजरातच्या भूमीत जन्माला आलेले महात्मा गांधी हे माझे राजकारणातील आदर्श आहेत, असं अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज (मंगळवार) जामनगर येथे निवडणूक प्रचार मेळाव्यात बोलले.
राहुल गांधी म्हणाले, ते जेव्हा राजकारणाचा विचार करतात तेव्हा सर्वप्रथम गांधीजींचा विचार त्यांच्या मनात येतो आणि गांधीजींची सर्व शक्ती आपल्यासोबत असल्यासारखे वाटते.  
अनेकांना वाटते गांधीजींचे विचार हे कालबाह्य झाले आहेत. पण मी त्यांना माझा गुरू मानतो. काहीवेळेस आपल्याला तत्वांसाठी कायद्याची अंमलबजावणी करावी लागते, असंही राहुल गांधी पुढे म्हणाले.
गांधी म्हणाले, आपण लोकांची मतं ऐकली पाहिजेत. यूपीए सरकारकडे आणि त्यांच्या योजनांकडे पाहिलात तर तुमच्या हे लक्षात येईल, मला त्यापैकी एखादी तरी अशी गोष्ट सांगा जिथे लोकांच्या मतांना किंमत नाही.
आपल्या बालपणीच्या राजकीय आठवणींबद्दल सांगताना राहुल गांधी यांनी जवाहरलाल नेहरू कारागृहात असतानाचा प्रसंग सांगितला. कशाप्रकारे गांधीजी नेहरूंसोबत जमिनीवर झोपले होते.
गांधीजी आज असले असते तर त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी भांडण्याकरीता उपदेश केला असता.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग गुजरात राज्याच्या विविध भागात प्रचारात गुंतले आहेत.