हैदराबादमध्ये एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. तेलंगणमधला हा पहिला मृत्यू होता. ७४ वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचा अंत उपचारादरम्यान झाला. मात्र त्याच्या अंत्यसंस्काराकडे त्याच्या कुटुंबीयांनी पाठ फिरवली. अखेर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीच या ७४ वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आत्तापर्यंत १ हजार पेक्षा जास्त लोकांना देशभरात करोनाची लागण झाली आहे. तर २९ जणांचा करोनामुळे देशभरात मृत्यू झाला आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान हैरदाबादमध्ये ज्या ७४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयही आले नाहीत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावर अंत्यसंस्कारही करावे लागले. तेलंगणमध्ये आत्तापर्यंत ७० जणांना करोनाची बाधा झाली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी ही माहिती दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. तसंच लोकांना स्वयंशिस्त पाळण्याचंही आवाहन केलं आहे.

या रुग्णाच्या अंत्यस्काराला काही कर्मचारीच उपस्थित होते. लॉकडाउनच्या दरम्यान अंत्यसंस्कार करतानाही २० लोकांपेक्षा जास्त लोकांनी गर्दी करु नये असे निर्देश देण्यात आले आहेत. करोनाशी लढाई सुरु आहे. या लढाईसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.