पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका प्रवासी बसमध्ये बॉम्बस्फोटात दोन मुलांसह ११ जण ठार तर २२ जण जखमी झाले आहेत. क्वेट्टा येथील सरयाब रोड स्थानकावरून बस सुटण्याच्या बेतात असताना हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले, की मरण पावलेल्यांत रोजंदारी कामगारांचा समावेश आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

बलुचिस्तानचे पोलिस महानिरीक्षक अलमिश खान यांनी सांगितले, की टायमर लावून या बसच्या टपावर ठेवलेल्या सामानात ठेवलेला बॉम्ब उडवण्यात आला. रोज सुटणाऱ्या बसगाडय़ांमधील ही शेवटची गाडी होती त्यामुळे जास्तीत जास्ती हानी पोहोचवण्याचा हेतू त्यात होता. पोलिस खात्याचे डॉक्टर डॉ. नूर बलोच यांनी सांगितले, की मरण पावलेल्यात मागच्या आसनांवर बसलेल्या लोकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून आठ जणांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. दुकानी बाबा चौक भागातील बस स्थानकावर या बसमध्ये स्फोट झाला. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री डॉ. मलिक बलोच यांनी या बॉम्बस्फोटाच्या कृत्याचा निषेध केला असून राज्यातील शांतात बिघडवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे.