१२ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; भाजप आणि तृणमूल यांचे आरोप-प्रत्यारोप

कोलकाता / नवी दिल्ली

निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला. गेल्या काही दिवसांत राज्यात विविध ११ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्य केले. दुसरीकडे, हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्यांचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी बंगालमध्ये दाखल झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, निवडणुकोत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असे नड्डा म्हणाले.

तृणमूल काँग्रेस हा असहिष्णू पक्ष आहे. मात्र, लोकशाही मार्गाने विचारांची लढाई लढण्यास भाजप कटिबद्ध आहे, असे नड्डा यांनी सांगितले. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन नड्डा यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पूर्व वर्धमान जिल्ह्य़ात सोमवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवास घोष (५४) या आपल्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचे तृणमूलने म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील या हिंसाचाराचा काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी निषेध केला. वाढत्या हिंसाचाराची दखल घेत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हिंसाचार करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश ममता यांनी दिले आहेत.

भाजप सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान-राज्यपाल चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.