पाकिस्तानमध्ये २०० भूकंपबळी, १३०० जखमी; अफगाणिस्तानमध्ये ६३ ठार
पाकिस्तान, अफगाणिस्तानला भूकंपाचा मोठा हादरा बसला असून, त्यात सुमारे २६३ लोकांचा बळी गेला आहे. सुमारे १३०० लोक जखमी झाली आहेत. तर दीड हजार घरांचे नुकसान झाले आहे. रिश्टर मापनावर या भूकंपाची नोंद ७.५ इतकी झाली असून, त्याचे धक्के उत्तर भारतातही जाणवले. दुपारी २.४० मिनिटांनी झालेल्या या धरणीकंपाचे धक्के काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानमध्ये बसले. भीतीमुळे हजारो लोक रस्त्यावर पळाले. दिल्लीतील मेट्रो सेवाही काही काळ थांबविण्यात आली.
पाकिस्तानमध्ये २०० तर अफगाणिस्तानमधील ६३ जणांना या भूकंपात प्राण गमवावे लागले आहेत. हिंदुकुश या अफगाणिस्तानातील पर्वतराजीत केंद्र असलेल्या या भूकंपाचा दुपारी २.४० वाजता जोरदार धक्का बसला. काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व राजस्थान येथेही धक्के बसले. काश्मीरमध्ये सोपोर येथे धक्क्य़ामुळे बंकर कोसळून दोन जवान जखमी झाले. या भूकंपाने उत्तर भारतात घबराट पसरली. उत्तराखंड येथे रहिवासी घराबाहेर पळाले. मसुरी, डेहराडून, हरिद्वार, रूरकी व हृषीकेश, अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, सोनेपत, गुडगाव, रोहतक, फरिदाबाद, पंचकुला, फतेहाबाद, सिरसा, भिवानी येथेही धक्के बसले आहेत. उत्तर प्रदेशात कमी तीव्रतेचे धक्के बसल्याचे सांगण्यात आले. राजस्थानात जयपूर, जोधपूर, सिकर येथे धक्के बसले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून अफगाणिस्तान व पाकिस्तानलाही मदतीची तयारी दर्शवली आहे. भूकंपामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले असून दिल्लीत मेट्रो वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.

’भूकंपाचा केंद्रबिंदू – ईशान्य अफगाणिस्तानात. राजधानी काबूलपासून २५० किमी अंतरावर हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये
’भूकंपाची तीव्रता – ७.५ रिश्टर स्केल
’भारतात दिल्ली, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे दुपारी भूकंपाचे धक्के.

भूकंपाच्या घटना

२५ एप्रिल २०१५ – नेपाळला ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. या भूकंपामुळे नेपाळमधील ९,०१८ जणांना
प्राण गमवावे लागले.
१२ मे २०१५ – नेपाळला ७.३ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. २१८ जणांचा मृत्यू
४ जून २०१५ – मलेशियात ६ रिश्टर स्केलच्या भूकंपात १८ जणांचा मृत्यू
१६ सप्टेंबर २०१५ – चिलीमध्ये ८.३ रिश्टर स्केलचा भूकंप. १४ जणांचा मृत्यू