वाराणसी येथे एक बांधकाम सुरु असलेला पुल कोसळल्यामुळे १२ जण ठार झालेले असताना आंध्रप्रदेशातूनही मोठी दुःखद घटना समोर आली आहे. राजामुंद्री येथे गोदावरी नदीत एक होडी उलटल्याने यातून प्रवास करणारे २३ स्थानिक लोक बेपत्ता झाले आहेत.


बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी डोरनिअर विमानांसह पाणबुड्यांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर २ हेलिकॉप्टर्ससह प्रशासनाकडून अतिरिक्त पाणबुड्यांचे पथक पाठवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी हे पथक बचावकार्य सुरु करणार आहे.


या घटनेतील नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या होडीतून प्रवास करणाऱ्या एकूण ४० जणांपैकी अनेक जण बेपत्ता झाले आहेत. तर १७ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती समजू शकलेले नाही. मात्र, बचावाचे काम तत्काळ सुरु करण्यात आला आहे. दुर्घटनाग्रस्त होडी कशी पलटली याची चौकशी सुरु आहे मात्र, पाण्यात बुडालेल्या लोकांना वाचवणे हे मोठे आव्हान आहे.