अफगाणिस्तानात मध्य काबूलमध्ये मंगळवारी अत्यंत वर्दळीच्या वेळी करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २८ ठार, तर ३२७ जण जखमी झाले आहेत, या हल्ल्यातील जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस प्रमुख महंमद इस्माइल कावुसी यांनी दिली. अध्यक्ष अशरफ घनी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून आमनेसामने लढण्यात तालिबानला जमत नसल्याने असे छुपे हल्ले ते करीत आहेत असे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा संस्थांची जी मुख्य कार्यालये आहेत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न तालिबानने केला आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्फोटानंतर घटनास्थळी धुराचे लोट दिसत होते. तालिबानने उन्हाळी हल्ले सुरू करण्याचा इशारा दिलेला असतानाच आजचा हल्ला झाला. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते सेदिकी सिद्दीकी यांनी सांगितले की, पहिला स्फोट आत्मघाती हल्लेखोरांनी मोटारगाडीत केला व एक-दोन आत्मघाती हल्लेखोरांनीही बॉम्ब उडवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी अफगाणी सुरक्षा दलांनी कडे केले आहे. तालिबानचा प्रवक्ता झैबिहुल्ला मुजाहिद याने असा दावा केला की, आमचे हल्लेखोर हे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या कार्यालयात घुसण्यात यशस्वी झाले आहेत. ही संस्था म्हणजे अफगाणिस्तानचे गुप्तहेर खात्याचे कार्यालय आहे. एनडीएसच्या आवारात जोरदार धुमश्चक्री झाली.मंगळवारचा हल्ला हा काबूल शहराच्या पुली महमूद खान भागात झाला. अफगाणी सुरक्षा दलांनी सरळ लढाईत तालिबानचा पाडाव केला आहे असे अफगाणी अध्यक्षीय प्रासादाने म्हटले आहे. अफगाण तालिबानने गेल्या मंगळवारीच उन्हाळी हल्ले सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. अफगाण सरकार तालिबानला वाटाघाटीसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात तालिबानने आताचा हल्ला करून वाटाघाटींना सुरुंग लावला. तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याच्या स्मृतिप्रीत्यर्थ तालिबानने ऑपरेशन ओमरी सुरू केले आहे त्यात देशभरात सरकारी सन्यदलांवर हल्ले करण्यात येणार आहेत. गेल्या आठवडय़ात तालिबानने कुंडूझ हे ठिकाण काबीज करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, पण शुक्रवारी अफगाणी सुरक्षा दलांनी तालिबानला माघार घेण्यास भाग पाडले होते. अफगाणी सुरक्षा दले तालिबानपुढे कितपत टिकू शकतील याची शंका आहे कारण गेल्या वर्षी ५५०० लोक मारले गेले होते. तालिबानने चर्चा करावी किंवा परिणामांना तयार राहावे असा इशारा पाकिस्तानने दिला आहे.