उत्तर कोरियामध्ये एका पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात असून यात ३० चिनी पर्यटकांचा मृ्त्यू झाला आहे. रविवारी रात्री ह्युंगाई हायवेवर ही दुर्घटना घडली. या अपघाताची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.


उत्तर कोरिया प्रशासनाच्या माहितीनुसार, ह्युंगाई महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु होते. तसेच खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक हे बीजिंग येथील चायनिज ट्रॅव्हल कंपनीचे कर्मचारी असल्याचे कळते. उत्तर कोरियातील चायनिज दुतावासानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चायनिज दुतावासाच्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील ह्युंगाई रोडवर काल रात्री भीषण रस्ता अपघात झाला असून यातील मृतांत मोठ्या प्रमाणावर चायनिज पर्यटकांचा समावेश असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

उत्तर कोरियात मोठ्या प्रमाणावर चायनिज पर्यटक येत असतात. येथे भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये त्यांचे ८० टक्के इतके प्रमाण असते.