सिक्कीमच्या डोकलाम भागावरून चीन आणि भारत यांच्यात सातत्यानं वाद सुरू आहे. आता चीननं भारतावर नवा आरोप केला आहे, भारतानं सोमवारपर्यंत आमच्या सीमेमध्ये ५३ सैनिक आणि एक बुलडोझर घेऊन घुसखोरी केली आहे, चीनचं मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’नं हा आरोप केला आहे. सोमवारपर्यंत भारतानं ५३ सैनिक आणि एक बुलडोझर चीनच्या सीमेमध्ये प्रवेश केला आहे, आपले सैनिक आणि बुलडोझर भारतानं मागे घेतलं पाहिजे. चीनच्या सीमेमध्ये प्रवेश करणं हे भारताचं अयोग्य पाऊल आहे, याची गंभीर दखल चीननं घेतली आहे.

भारत आणि चीनमध्ये जून महिन्यापासून डोकलामचा वाद सुरू आहे, अशा परिस्थितीत आता चीननं भारतावर आरोप केला आहे, या आरोपासाठी चीननं ‘ग्लोबल टाईम्स’चा आधार घेतला आहे. सिक्कीममध्ये डोकलामवरून जो तणाव निर्माण झाला आहे. डोकलाम वादावरून भारताची अवस्था आम्ही १९६२ प्रमाणे करू अशी धमकी चीनकडून सातत्यानं देण्यात येते आहे. आता चीननं भारतावर घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. चीनच्या सार्वभौमत्त्वाला भारतानं धक्का लावला आहे, असंही ‘ग्लोबल टाईम्सनं’ म्हटलं आहे.

भारतानं लवकरात लवकर आपले सैनिक आणि बुलडोझर मागे घ्यावेत असा इशारा चीननं दिला आहे. मागील आठवड्यात भारताच्या ४८ सैनिकांनी घुसखोरी केली होती, आता ही संख्या ५३ झाली आहे. भारतानं डोकलाममधून आपलं सैन्य तातडीनं हटवावं यासाठी चीनकडून सातत्यानं भारतावर दबाव आणला जातो आहे. भारतानं दोन्ही बाजूंनी आपलं सैन्य मागे घ्यावं अशी मागणी चीननं केली आहे. सिक्कीम सेक्टरच्या डोकलामवर भारत, चीन आणि भूतान या तिन्ही देशांनी दावा केला आहे. तसंच डोकलामच्या घुसखोरीवरून या दोन्ही देशांमधले संबंध विकोपाला गेले आहेत.

अशात डोकलामप्रश्नी कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही असा दावा चीनमधल्या काही तज्ज्ञांनी केला आहे. चीनच्या पीपल्स रिबलेशन आर्मीच्या तज्ज्ञांनी हा दावा केला आहे. भारतानं चीनमध्ये जी घुसखोरी केली आहे त्यावर आम्ही सध्या तरी शांत आहोत, सामोपचारानं भारतानं सैन्य मागे घ्यावं नाहीतर आम्हाला हल्ला करता येतो असंही चीनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीय सैन्यानं कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय आपलं सैन्य डोकलाममधून मागे घ्यावं ते न घेतल्यास आम्हाला युद्ध पुकरावं लागेल असा इशाराच चीननं दिला आहे. चीन आणि भारत यांच्यातल्या या तणावाच्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.