रसायनांचे गोदाम पेटल्याने परिसरातील नागरिकांचा बळी

ढाका : बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये निवासी इमारती आणि रासायनिक गोदामाला लागलेली आग झपाटय़ाने पसरल्याने किमान ८१ जण ठार झाले असून ५० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जुन्या ढाक्यातील अत्यंत दाटीवाटीच्या चौकबाजार परिसरातील मशिदीमागे असलेल्या हाजी वाहेद मॅन्शन या पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या रासायनिक गोदामात बुधवारी रात्री आग लागली. ही आग विवाह समारंभ सुरू असलेल्या समाज केंद्रासह शेजारच्या इमारतींमध्ये झपाटय़ाने पसरली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या परिसरामध्ये रासायनिक गोदामांची संख्या अधिक असल्याने आग झपाटय़ाने पसरली. त्यामध्ये ७० जण ठार झाले असून अद्यापही अनेक जण इमारतींमध्ये अडकले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची भीती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी प्रथम आग लागली त्या ठिकाणी कर्मचारी अद्यापही पोहोचू शकलेले नाहीत.

बहुसंख्य मृतदेह इमारतीभोवतालच्या घरातून बाहेर काढण्यात आले, त्या इमारतीमध्ये शिरण्याचा अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असावी आणि रसायने ठेवलेल्या ठिकाणी पसरली, असे अग्निशमन दलाचे प्रमुख अली अहमद यांनी म्हटले आहे. आगीच्या ज्वाळा शेजारच्या चार इमारतींपर्यंत पोहोचल्या तेथेही रसायनांची गोदामे होती. आग लागताच ढाका येथे वाहतुकीची कोंडी झाली, आग इतक्या झपाटय़ाने पसरली की लोकांना आपली सुटका करता आली नाही, असेही ते म्हणाले.

एका इमारतीच्या मुख्य द्वाराला कुलूप असल्यामुळे तेथील नागरिक अडकून पडले. मृतांमध्ये पादचारी, जवळच्या उपाहारगृहात आस्वाद घेणारे आणि विवाह समारंभातील पाहुणे यांचा समावेश आहे. या आगीत जखमी झालेल्या ५० हून अधिक जणांमध्ये महिला, मुलांचा समावेश आहे. त्यांना ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल. इमारतीमधून उडय़ा मारल्याने काही जण जखमी झाले आहेत.

हेलिकॉप्टरचा वापर

आगीचे वृत्त कळताच अग्निशामक दलाचे ३७ बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले, मात्र चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बंब घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापरही करण्यात आला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात असली तरी रसायनांमुळे ती धुमसत होती.