लिबियाची राजधानी त्रिपोली येथे भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या कॉरिंथिया या उच्चभ्रू हॉटेलवर मंगळवारी पाच सशस्त्र व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन रखवालदारांचा मृत्यू झाला आहे.
ट्रिपोलीतील सुरक्षा दलांचे प्रवक्ते एस्समाम-अल-नास यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच सशस्त्र हल्लेखोरांनी हॉटेलची सुरक्षा भेदून अचानक केलेल्या गोळीबारात तीन रखवालदार ठार झाले. हल्ल्याने गोंधळलेल्या कर्मचाऱ्यांनी येथील पाहुण्यांना मागील दाराने कार पार्किंगमधून बाहेर काढले. त्या वेळी पार्किंगमधील एका कारचा स्फोट झाला. लिबियाचे पंतप्रधान ओमर-अस हस्सी बरेचदा येथे मुक्कामाला असतात. पण मंगळवारच्या हल्ल्यावेळी ते तेथे नव्हते. हे हॉटेल विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हल्ल्यावेळी तेथे गर्दी कमी असली तरी इटली, ब्रिटन आणि तुर्कस्तानचे काही पाहुणे तेथे होते.
याच हॉटेलवर २०११ साली झालेल्या हल्ल्यात तेथून तत्कालीन पंतप्रधानांचे अपहरण झाले होते.