पुराचे पाणी साचलेल्या रस्त्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जाणे सुलभ व्हावे या सदिच्छेने त्यांची चप्पल हाती घेतली, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी बुधवारी केले. नारायणसामी यांनी राहुल गांधी यांची चप्पल हातात घेतल्याची व्हिडीओ फीत प्रसारित झाल्याने त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.
राहुल गांधी यांनी मंगळवारी पुडुचेरी आणि तामिळनाडूतील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. केंद्रशासित प्रदेशात त्यांच्यासमवेत नारायणसामी यांच्यासह प्रादेशिक पक्षांचे नेतेही होते. या दौऱ्याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली होती. एका छायाचित्रात नारायणसामी हे वाकून राहुल गांधी यांची चप्पल हातात धरत असल्याची फीत प्रसारित करण्यात आली. राहुल गांधी यांच्या चपला नारायणसामी यांनी हातात धरल्या आहेत, असा दावा काही माध्यमांनी केला. मात्र त्या चपला आपल्याच होत्या आणि राहुल गांधी यांना पुरातून वाट काढत जाताना त्यांची गरज भासल्यास त्या देता याव्यात यासाठी आपणच त्या हातात धरल्या होत्या, असे नारायणसामी म्हणाले.