अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर टू प्लस टू बैठकीसाठी भारतात आले आहेत. त्यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. डोवाल आणि अमेरिकेच्या दोन्ही मंत्र्यांमध्ये रणनितीक मुद्दे आणि दोन्ही देशांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली.

पॉम्पिओ चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. भारतापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होत आहे. त्यानंतर ते श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जाणार आहेत. लडाख सीमेवर तणावाची स्थिती असताना, पॉम्पिओ आणि एस्पर यांचा हा दौरा खूप महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेतील वृत्तानुसार, चीनला रोखणे हाच पॉम्पिओ यांच्या चार देशांच्या दौऱ्यामागचा मुख्य उद्दश आहे.

पॉम्पिओ आणि डोवाल बैठकीत पूर्व लडाख सीमेवरील स्थिती संदर्भातही चर्चा झाली. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याबरोबरच स्थिर, सुरक्षित आणि जगात सुरक्षित वातावरण कसे निर्माण होईल यावर डोवाल, पॉम्पिओ आणि एस्पर यांच्यात चर्चा झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा- ‘आम्ही आमच्या भूमीवर लढूच’ पण…NSA डोवाल यांचे महत्त्वाचे विधान

‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘बीइसीए’ला मान्यता देण्यासाठीही प्रयत्न होणार असून त्यामुळे दोन्ही देशातील संरक्षण संबंध वाढणार आहेत. ‘बीइसीए’मुळे उच्च लष्करी तंत्रज्ञान, काही भौगोलिक नकाशे व रसद यांच्या आदानप्रदानाची प्रक्रिया सोपी होणार आहे. २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून दर्जा दिला आहे. त्यावर्षी ‘एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट’ (एलइएमओए) करार दोन्ही देशात झाला होता.