पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाला. मागच्या आठवडयात भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठीकत चीनने स्वत: हे सांगितले होते. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चुशूलमधील मोल्डो येथे बैठक सुरु असताना ही माहिती समोर आली आहे.

मोल्डो हे ठिकाण चीनमध्ये आहे. १९६७ नंतर प्रथमच मागच्या आठवडयात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचे वृत्त दिले आहे. आठवडयाभरानंतर भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी बैठक सुरु असताना ही माहिती समोर आली आहे.

या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. गलवान नदीजवळ १५ हजार फूट उंचीवर हा संघर्ष झाला होता. तणाव वाढवायचा नसल्याने चीनने अजूनपर्यंत नेमकी जिवीतहानी किती झाली? याबद्दल काहीही सांगितलेले नाही. या संघर्षात कर्नल संतोष बाबू सुद्धा शहीद झाले.

चीनचा हल्ला विफल करण्यासाठी भारताने तैनात केली स्पेशल ‘माऊंटन फोर्स’
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यात निपुण असलेली विशेष फोर्स तैनात केली आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व सेक्टरच्या सीमारेषेवर ही विशेष माऊंटन फोर्स तैनात झाली आहे.

कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण रेषा सुरक्षित ठेवण्याचे भारतीय लष्कराला निर्देश देण्यात आले आहेत. चीनने गलवान खोऱ्याजवळ मोठया प्रमाणात सैन्याची जमवाजमव करुन ठेवली आहे. चीनची युद्धवाहने देखील इथे मोठयाप्रमाणामध्ये आहेत. मागच्या अनेक वर्षात भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यासाठी विशेष तुकडयांना प्रशिक्षित केले आहे.