“मंत्री असण्या अगोदर मी एक वडील आहे. माझी मुलगी ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कोविड वॉर्डात कार्यरत होती. तिने मला स्वतःहून सांगितले होते की ती त्या वॉर्डात काम करेल आणि तिने काम सुरू केले. त्यावेळी मला थाळी-टाळीचं महत्वं पटलं. त्यामधून आम्हाला धैर्य मिळालं.” अशा शब्दांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज(मंगळवार) राज्यसभेत बोलताना आठवण सांगितली. करोना संकटात पंतप्रधान मोदींनी जनतेला टाळी-थाळी वाजवण्याचं आवाहन केलं होतं, त्यावरून विरोधकांडून सातत्याने मोदी सरकारवर टीका केली गेली आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री मांडवीय यांनी यावेळी विरोधकांना उद्देशून म्हटले की, “ते विचारतात आम्ही थाळी-टाळी का वाजवली? आम्ही हे करोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी केलं होतं. आम्ही हे त्या पोलिसासाठी केलं जो आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर उभा असतो, आम्ही हे कनिष्ठ स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी केलं, जे करोना काळात आपलं कर्तव्य बजावत होते.”

तसेच, “आमच्या सरकारने नेहमीच सांगितलं आहे की, या संकटाला राजकारणाचं कारण नाही बनू दिलं पाहिजे. अशा संकट काळात राजकारण नाही झालं पाहिजे. पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे की, जेव्हा १३० कोटी भारतीय एक पाऊल पुढे टाकतील, तेव्हा देश १३० कोटी पावलं पुढे जाऊ शकतो. जेव्हा आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल बोलत असतो, तेव्हा देशातील १३० कोटी सर्वसामान्य जनतेला, सर्व राज्य सरकारांना सर्वानुमते एक निर्णय घ्यावा लागेल की आम्ही आमच्या देशात करोनाची तिसरी लाट येऊ देणार नाही. आपला संकल्प व पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आपल्याला करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवू शकते. जेव्हा सोबत काम करण्याची गरज आहे आणि राज्यांकडून काम केलं गेलं पाहिजे, तेव्हा आम्ही कधी म्हटलं नाही की हे राज्य अयशस्वी ठरलं किंवा त्या राज्याने असं नाही केलं. मी राजकारण करू इच्छित नाही, मात्र अनेक राज्यांकडे १० ते १५ लाख लसीचे डोस आहेत, माझ्याकडे याची माहिती आहे.” असंही यावेळी आरोग्यमंत्री मांडवीय यांनी बोलून दाखवलं.