News Flash

भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला बलुचिस्तानमधील हिंसाचाराचा मुद्दा

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचेही भारताने ठणकावले आहे.

बलुचिस्तानच्या मुद्द्यावरुन भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी नवी खेळी खेळली आहे. बलुचिस्तानमधील हिंसाचारात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत उपस्थित केला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचेही भारताने ठणकावले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेची ३३ वी वार्षिक सभा सुरु आहे. या सभेत भारताने बलुचिस्तानचा मुद्दा मांडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी अजित कुमार यांनी दिली आहे. भारताने या सभेत जम्मू काश्मीरविषयीही भूमिका स्पष्ट केली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागात समाजातील सर्व स्तरातील लोक राहतात. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तसे चित्र दिसत नाही असे अजित कुमार यांनी परिषदेत सांगितले. आता फक्त पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरचा भाग परत घेणे बाकी आहे असेही भारताने ठणकावून सांगितले. तसेच पाकिस्तानमधून भारतात कशा पद्धतीने दहशतवादी घुसखोरी करतात हेदेखील सांगण्यात आले. हे दहशतवादी गर्दीत घुसून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अजित कुमार यांनी केला. पाकिस्तानने आपली उर्जा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणा-या मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यावर खर्च करावी असेही भारताने म्हटले आहे. पाकिस्तानची ओळख हुकूमशाही, लोकशाही मूल्यांची उणीव आणि बलुचिस्तानसह देशभरात होणा-या मानवी हक्कांच्या उल्लंघनांसाठी आहे असा दावाही भारताने संयुक्त राष्ट्रात केला.
परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्राच्या समितीला काश्मीर दौरा करण्यास मज्जाव केला होता. संयुक्त राष्ट्राच्या पथकाने पाकव्याप्त काश्मीरचाही दौरा करावा अशी मागणी भारताने केली होती. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या समितीला पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करण्याची परवानगी दिली होती. मात्र भारताने ही मागणी धुडकावून लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टरोजी लाल किल्ल्यावरील भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील हिंसाचाराचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार भारताने संयुक्त राष्ट्रात बलुचिस्तानचा मुद्दा मांडला आहे. पाकिस्ताननेही काश्मीरमधील हिंसाचाराचा मुद्दा जगभरात मांडण्यासाठी २२ खासदारांची विशेष दूत म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव दिवसेगणिक वाढत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 10:21 pm

Web Title: at unhrc india raises human rights violation issue in pok
Next Stories
1 इस्लाम धर्मात दहशतवादाला थारा नाही – अश्रफ घनी
2 न्यायधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोणताही खोळंबा नाही- केंद्र सरकार
3 रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण देशातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत २५ व्या स्थानी
Just Now!
X