माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. हळवा कवी, संयमी राजकारणी अशी वाजपेयींची ओळख होती. ९० च्या दशकात त्यांनी भाजपाला देशाच्या राजकारणात स्थिरावण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. २५ डिसेंबर १९२४ मध्ये मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरात अटलजींचा जन्म झाला होता. वाजपेयींना संसदीय कामाचा सुमारे पाच दशकांचा अनुभव होता.

वाजपेयी हे १९५१ मध्ये भारतीय राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी १९५५ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९५७ मध्ये ते खासदार झाले. ते एकूण १० वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. तर दोन वेळा १९६२ आणि १९८६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार होते. याचदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि मध्य प्रदेश येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर गुजरातमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते.

वक्तृत्व, मनमोहक हास्य, बोलण्यातील सहजता, लेखन आणि विचारांप्रती निष्ठा तसेच निर्णय घेण्यासाठी वाजपेयी प्रसिद्ध होते. त्यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली होती. काँग्रेस वगळता इतर पक्षाचे देशातील सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधानपदी ते होते. भाजपाचे उदारवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती.

१९९९ साली त्यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी भाजपाच्याच काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भारत-पाकमधील संबंधातील ही नवी सुरूवात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

भाजपा चार दशके विरोधी पक्षात राहिल्यानंतर वाजपेयी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी त्यांचे सरकार अवघ्या १३ दिवसांत कोसळले होते. त्यानंतर १३ महिन्यांतर १९९९ च्या सुरूवातीला बहुमत नसल्या कारणाने त्यांचे सरकार दुसऱ्यांचा पडले. १९९९ च्या निवडणुकीत वाजपेयी यांनी आधीपेक्षा स्थिर सरकार दिले. त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आघाडीच्या राजकारणामुळे भाजपाला आपल्या प्रमुख मुद्यांपासून दूर राहावे लागले.

११ मे आणि १३ मे १९९८ मध्ये पोखरण मध्ये पाच भूमिगत अणू चाचणी करून अटल बिहारी वाजपेयी यांनी जगाला चकीत केले होते. भारताची ही दुसरी अणवस्त्र चाचणी होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा, जपान आणि यूरोपियन देशांसह अनेक देशांनी भारतावर निर्बंध घातले होते. त्यानंतरही अटल सरकारने देशाचा जीडीपी वाढवून दाखवला होता. पोखरण येथील अणवस्त्र चाचणीचा निर्णय वाजपेयींचा सर्वांत मोठा आणि महत्वाचा निर्णय मानला जातो.

१९७७ मध्ये मोरारजी देसाई सरकारमध्ये वाजपेयी हे विदेश मंत्री होते. याचदरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण केले होते. हिंदीत भाषण करणारे ते भारताचे पहिले विदेश मंत्री होते.

वाजपेयींनी राजकारणात पक्षविरहीत राजकारण केले. जीवनात येणाऱ्यी विषम परिस्थिती आणि आव्हानांचा त्यांनी स्वीकार केला. राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. जनसंघाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कवितांबाबत ते म्हणाले होते की, माझ्या कविता ही युद्धाची घोषणा आहे, पराजयाची प्रस्तावना नाही. तिथे पराभूत सैनिकांचे नैराश्य-निनाद नाही, लढणाऱ्या योध्याचा विजयाचा संकल्प आहे. ते निराशेचे स्वर नाहीत, आत्मविश्वासाचा जयघोष आहे. ‘मेरी इक्यावन कविताएं’ हा त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला होता. यातील हार नही मानूगां, रार नही ठानूंगा ही कविता खूप प्रसिद्ध झाली होती.

१९९६ मध्ये केवळ एका मताने त्यांचे सरकार पडले होते. हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका निभावली. त्यानंतर ते पुन्हा पंतप्रधान झाले. राजकीय सेवेचे व्रत घेतलेले वाजपेयी अविवाहित होते. त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघासाठी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांनी अत्यंत कुशलतेने भाजपाला देशात राजकीय सन्मान मिळवून दिला. दोन डझनहून अधिक पक्षांच्या सहकार्याने त्यांनी एनडीएन सरकार स्थापन केले. त्यांच्या मंत्रिमंडळात ८० हून अधिक मंत्री होते. त्यांचे या मंत्रिमंडळाला जम्बो मंत्रिमंडळ म्हटले जात. या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.