११ मे १९९८ हा दिवस आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो. कारण याच दिवशी भारताने जगाला आम्हीही काही कमी नाही हे दाखवून दिले होते. राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने याच दिवशी यशस्वी अणू चाचण्या केल्या होत्या. या घटनेला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, भारताच्या या गुप्त मोहिमेमुळे अमेरिकाही चकित झाली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अणू चाचणीच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक् झाले होते. ११ मे १९९८ रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने तीन अणू चाचण्या आणि त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाच अणूस्फोटाच्या यशस्वी चाचण्या केल्या होत्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाचे म्हणजे अमेरिकेसह जगातील कुठल्याही देशाला काहीही थांगपत्ता लागू न देता भारताने ही मोहीम यशस्वी करुन दाखवली होती. भारताचे दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम भारताच्या या ‘सिक्रेट मिशन’चे प्रमुख होते. अणू चाचणी करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, असे भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव के. रघुनाथ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना सांगितल्यानंतर काही महिन्यातच ही चाचणी करण्यात आली. या अणू चाचणीबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. पाच जणांनाच या चाचणीबद्दल माहिती होती. त्यावेळी भारताच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असलेली अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि अमेरिकन सॅटलाइटसला चकवा देऊन या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

या घटनेनंतर चिडलेल्या अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. मात्र, वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिले. त्यामुळेच भारताचे सामर्थ्य लक्षात घेता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणूऊर्जा करार केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayee brave decision on pokhran
First published on: 16-08-2018 at 18:11 IST