नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयी यांची तब्येत ढासळते आहे, हा संदेश गुरुवारी सकाळीच राजधानीत वाऱ्यासारखा पसरला.. स्वातंत्र्य दिनाच्या आधीदेखील त्यांची प्रकृती पुरेशी स्थिर नसल्याचे बोलले जात होते, पण सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केल्याने गांभीर्य वाढले. पत्रकार मोठय़ा संख्येने अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या -‘एम्स’च्या-  प्रांगणात दाखल होऊ लागले.

या संस्थेच्या भव्य आवारात मधोमध, ‘कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर’ची इमारत आहे. तिच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात अटलजी आहेत, हे साऱ्यांनाच माहीत होते.

पत्रकारांपैकी कुणालाच माहीत नव्हती, ती त्यांची आत्ताची स्थिती. ‘कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर’च्या पायरीपासून दहा फुटांवर होते सारे पत्रकार. पण पत्रकारांसह अन्य कुणालाही आत शिरणे अशक्य करणारा कडेकोट बंदोबस्त पहिल्या पायरीपासूनच होता. केवळ निवडक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच या पायऱ्यांपर्यंत पोहोचू शकत होत्या. हे सारे केंद्रीय नेते, पदाधिकारी चौथ्या मजल्यावरच जात आहेत हे उघड होते, पण तेथून परतल्यावर त्यांच्याशी बोलणे- नेहमीप्रमाणे अशा नेत्यांच्या वाहनाला कॅमेऱ्यांसह वृत्तवाहिनी-प्रतिनिधींनी आणि त्यांच्या गदारोळात जमेल तितक्या छापील माध्यमांतील पत्रकारांनी गराडा घालणे.. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे.. यातले काहीही अशक्यच ठरेल, इतका बंदोबस्त!

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे सकाळी आठ वाजता येथे आले होते. कलत्या सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येऊन गेले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे दुपारी एकाच वेळी या इमारतीत होते. आता आरोग्यासह, सुरक्षा अथवा अन्य बाबींचाही आढावा घेण्यात आलेला असणार, याची अटकळ पत्रकार बांधत होते आणि कोणत्याही क्षणी ती अप्रिय बातमी येणार, यासाठी मन घट्ट करीत होते. एव्हाना भाजप कार्यकर्त्यांचीही गर्दी या परिसरात जमू लागली होती, पण त्यांना तर ‘एम्स’च्या आवारातही प्रवेश नव्हता. अरोबिंदो मार्गावर, म्हणजे वाजपेयींना ठेवले होते त्या इमारतीपासून फर्लागभर दूर – हे कार्यकर्ते होते.

दुपारी तीन- पुन्हा एकदा अमित शहा आले, पंतप्रधान मोदीही पुन्हा साडेतीनच्या सुमारास आले. आता मात्र व्हायचे ते होणारच, हे साऱ्यांनीच ओळखले होते. अधिकृत, औपचारिक घोषणाच आता होणार, याची ती भयशंका.  दिल्लीत हवेचे जडत्व आज विनाकारण अधिक जाणवत होते साऱ्यांना. सकाळपासून जी बातमी झरझर पसरली, तिने जणू मोठ्ठा अर्धविराम घेतला होता.

‘कधी?’ या प्रश्नाचे एक संभाव्य उत्तर मोदी येऊन गेल्यानंतर मिळाले- ‘साडेपाच वाजता रुग्णालयातर्फे आरोग्य वार्तापत्र प्रसृत होईल.’ तशात ‘डीडी न्यूज’ने निधनवार्ताच देऊन टाकली.. पत्रकारांचे भ्रमणध्वनी खणखणू लागले- ‘आपल्याकडे कशी नाही पोहोचली ही माहिती?’- तेवढय़ात पुन्हा फोन- ‘ नाही नाही.. डीडी न्यूजनेच मागे घेतली आहे ती बातमी!’

सायंकाळी पाच वाजता या अनिश्चिततेच्या वातावरणाला पूर्णविराम मिळाला. ‘पार्थिव आधी कृष्णमेनन मार्गावरील निवासस्थानी, तर शुक्रवारी सकाळी भाजपच्या मुख्यालयात ठेवले जाईल’ ही माहिती घेऊन पत्रकारांनीही ‘एम्स’ सोडले.