भारतरत्न आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाला बुधवारी अडचणींचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं. अस्थी विसर्जनसाठी वाजपेयींचं कुटुंब पोहोचलं होतं. मात्र त्यांच्यासाठी घरी परतताना गाडीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत कुटुंबाला रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभं राहावं लागलं. खूप वेळाने रिक्षा मिळाल्यानंतर ते घरी पोहोचू शकले. वाजपेयींची भाची कांती मिश्रा यांनी खंत व्यक्त करत सांगितलं की, ‘जे चारचाकीवाले होते ते आपापल्या गाडीने पोहोचले. आम्ही रिक्षावाले असल्याने रिक्षाने आलो’.

वाजपेयींचं ग्लावियरमध्ये जुनं घर असून तिथे त्यांची भाची कांती मिश्रा, त्यांचे पती ओपी मिश्रा आणि मुलगी कविता यांच्यासहित इतर नातेवाईक राहतात. अस्थी विसर्जनासाठी सर्व कुटुंबीय पोहोचले होते. मात्र तेथून परतत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

मुख्यमंत्री शिवराज सिंहदेखील विमानतळावरुन थेट कार्यक्रमात पोहोचले होते. अस्थी विसर्जन झाल्यानंतर ते वाजपेयींच्या घरी पोहोचले होते. मात्र घरात कोणीच उपस्थित नव्हतं. कारण त्यावेळी सर्व कुटुंबीय घरी परतण्यासाठी रिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभं होतं. कुटुंबीयांचा रस्त्यावर उभे असतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.