काश्मीरमधील अशांत वातावरणाचे अनेक पैलू असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आजवर अनेक प्रकारे प्रयत्न झाले आहेत. दरम्यान, राज्यकर्त्यांकडून इथली परिस्थिती हाताळतानाही अनेक चुका झाल्याने त्याचे उलटे परिणाम पहायला मिळाले आहेत. मात्र, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना इथल्या परिस्थितीची कारणे उमगली होती. त्यामुळेच आजच्या काश्मीरची स्थिती पाहता वाजपेयींच्या काश्मीरबाबतच्या धोरणांची आजही गरज असल्याचे काश्मीरी नेते आणि जनतेकडून म्हटले जाते.

वाजपेयींनी काश्मीरी जनतेला नव्या त्रिसूत्रीचा विचार दिला होता. यामध्ये काश्मीरची संस्कृती (काश्मीरियत), लोकशाही भावना (जमुरियत) आणि माणुसकीचा दृष्टीकोन (इन्सानियत) यांचा समावेश होता. हे उद्देश गाठण्यासाठी काश्मीरची परिस्थिती बिघडवण्यास कारणीभूत असलेला आपला शेजारी देश पाकिस्तानशी सतत चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळेच आपल्या कार्यकाळात त्यांनी कायमच पाकिस्तानशी खुलेपणाने संवाद साधला. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला होता. विशेष म्हणजे कारगिल युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतरही त्यांनी पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग खुला ठेवला होता.

काश्मीरबाबत केंद्र सरकारकडून घेण्यात आलेले अनेक निर्णय चुकीचे होते. तसेच राष्ट्रीय स्तरावरील कोणताही नेता काश्मीरींचे दु:ख समजू शकत नाही, हे वाजपेयींना ठाऊक होते. त्यामुळेच त्यांनी १८ एप्रिल २००३ रोजी श्रीनगरमधील एका जाहीर सभेत काश्मीरी जनतेला उद्देशून भाषण करताना भावनिक साद घातली होती. आम्ही इथे तुमचे दुःख वाटून घ्यायला आलो आहोत, असे त्यांनी म्हटले होते. आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्यावर आपल्याला एकत्र उपाय शोधायचा आहे. आपण दिल्लीचे दरवाजे कधीही ठोठावले तरी केंद्र सरकार कायम आपल्या मदतीसाठी तयार असेल. आमच्या हृदयाचे दरवाजे कायम तुमच्यासाठी कायमच खुले असतील, असे वाजपेयी म्हणाले होते. त्यांच्या या भावनिक सादेचा चांगलाच परिणाम झाला होता. यामुळे काश्मिरींना पहिल्यांदाच वाटले होते की, भारतीय पंतप्रधान त्यांच्या दुःखावर भाष्य करीत आहेत.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी काश्मीरमधील सर्व फुटिरतावाद्यांसह काश्मीरी जनतेशी काश्मीरियत, जमुरियत आणि इन्सानियतच्या चौकटीत राहून संवाद साधला होता. यापूर्वी जेव्हाही सरकारने फुटिरतावाद्यांशी चर्चा केली, तेव्हा कायद्याच्या चौकटीत राहूल चर्चेसाठी प्रयत्न केले. मात्र, अशी चर्चा फुटिरतावाद्यांना मान्य नव्हती. त्यामुळे वाजपेयींनी संविधाच्या चौकटीबाबत न बोलता आपल्या त्रिसूत्रीचा वापर केला होता. तसेच दुसरीकडे पाकिस्तानसोबत मैत्रीचा हात पुढे केला होता. यामुळे पाकिस्तान येथील फुटिरतावाद्यांना केंद्र सरकारशी चर्चेसाठी रोखू शकत नव्हता. त्यामुळे या फुटिरतावाद्यांच्या नेत्यांनी तत्कालिन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात शांततेचे वातावरण होते.