भारतीय जनता पक्षाने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं भव्य स्मृतीस्थळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी वाजपेयींवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या राष्ट्रीय स्मृती स्थळावरच हे स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. १६ ऑगस्ट रोजी अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. १७ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १५ सप्टेंबरपासून स्मृतीस्थळाच्या बांधकामाला सुरुवात होईल. बांधकामाची जबाबदारी असणाऱ्या टीमला वेगाने काम करण्यास सांगण्यात आलं असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबरला वाजपेयींचा ९४ वा वाढदिवस असून त्याआधी स्मृतीस्थळाचं काम पूर्ण करण्याचा वरिष्ठ नेत्यांचा आदेश आहे.

बांधकामाची जबाबदारी असणाऱ्या टीमने २६ जानेवारी २०१९ च्या आधीच काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील प्रजासत्ताक दिनाला स्मृतीस्थळाचं उद्घाटन करण्याचं नियोजन आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०१९ मध्ये पार पडण्याची शक्यता असून त्याआधी हे उद्घाटन पार पडेल. तसं पहायला गेल्यास वाजपेयींसाठी स्मृतीस्थळ उभारत भाजपा स्वत:चा राजघाट उभारत आहे.