अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा महान नेता होणे नाही असे म्हणत त्यांचे परममित्र आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. अटलजींचे गुणवर्णन खूप करता येईल. मात्र या ठिकाणी मला आवर्जून एक आठवण सांगतो की अटलजी खूप चांगला स्वयंपाक बनवत असत. अगदी खिचडी असेल तरीही ते अत्यंत उत्तम पद्धतीने बनवत. त्यांची आणि माझी मैत्री ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ होती. ते माझे मार्गदर्शक होते, माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान हे कायम अढळ राहिल असेही आडवाणी यांनी म्हटले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आडवणी यांनी या आठवणी जागवल्या.

यावेळी लालकृष्ण आडवणी यांनी त्यांच्या पुस्तकाचीही आठवण सांगितली. मी जेव्हा पुस्तक लिहिले त्याबाबत मी अटलजींना कल्पना दिली होती. मात्र ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. मी ज्यांच्याकडून शिकलो आणि इथवर आलो त्यामध्ये मुख्य योगदान हे अटलजींचे होते. भाजपामध्ये अशी अनेक महान माणसे आहेत ज्यांच्याकडून मी शिकलो आहे. मात्र अटलजींकडून जे शिकलो ते कधीही न विसरता येण्यासारखे आहे. ते आज आपल्यात नाहीत याचे दुःख पदोपदी होते आहे. आम्ही सोबत पुस्तके वाचत असू, सिनेमा पाहात असू. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ माझी आणि अटलजींची मैत्री होती, त्यांच्याकडून खूप काही शिकलो असेही आडवाणी यांनी म्हटले आहे.

आज या ठिकाणी संघ, भाजपाशी संबंधित लोक तर आले आहेतच पण असेही लोक आले आहेत जे अटलजींना ओळखत नाहीत, किंवा अटलजींचा आणि त्यांचा फारसा परिचय नाही. मात्र अटलजी अजातशत्रू होते त्यामुळेच त्यांनी विरोधकांनाही आपलेसे करून घेतले होते. त्यांचे राजकारण सर्वसमावेशक होते असेही आडवाणी यांनी म्हटले आहे.