जगभरात आपल्या राजकीय कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराला श्रीलंकेचे परराष्ट्रव्यवहार मंत्री लक्ष्मण किरियेला हे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता वाजपेयींवर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहे.


अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला देश-विदेशातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरियेल्ला हे देखील उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ०५ मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतीस्थळी शुक्रवारी, १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.