News Flash

काबूल पुन्हा हादरले; ९५ ठार

या परिसरात अनेक सरकारी इमारती आणि विविध देशांचे दूतावास आहेत.

स्फोटकांनी भरलेली रुग्णवाहिका उडविली * १५८ जखमी; तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

काबूल शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरांत शनिवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी खच्चून भरलेल्या एका रुग्णवाहिकेचा स्फोट घडविला. त्यामध्ये किमान ९५ जण ठार झाले असून अन्य १५८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. रुग्णालयात आणण्यात आलेल्या काही जखमींची स्थिती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यांत घडविण्यात आलेल्या स्फोटानंतरचा हा मोठा स्फोट आहे. स्फोट होताच परिसरात एकच हाहाकार माजला, भयभीत नागरिक घटनास्थळाहून पळून गेले. या परिसरांत युरोपीय समुदायासह अनेक उच्च संघटनांची कार्यालये आहेत.

स्फोट झाल्यानंतर नजीकच असलेल्या जमुरियत रुग्णालयात मृतदेहांचा खच पडल्याचे आणि रक्तबंबाळ महिला, पुरुष आणि मुलांवर उपचार करताना तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. रुग्णालयातून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या स्फोटांत आतापर्यंत ९५ जण ठार झाल्याचे तर १५८ जण जखमी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहीद मजरोह यांनी सांगितले.

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की दोन कि.मी. अंतरावरील इमारतींना हादरे बसले तर १०० मीटर परिसरात असलेल्या इमारतींच्या खिडक्या तुटल्या. या परिसरातील काही बैठी घरेही कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

आत्मघातकी हल्लेखोराने तपासणी नाक्याला हुलकावणी देण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला. पहिल्या तपासणी नाक्यावर हल्लेखोराला अडविण्यात आले तेव्हा त्याने रुग्णाला जमुरियत रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले. मात्र दुसऱ्या टप्प्यावर त्याचा खोटारडेपणा उघड होताच त्याने स्फोटकांनी खच्चून भरलेल्या रुग्णवाहिकेचा स्फोट घडविला, असे अंतर्गत मंत्रालयाचे उपप्रवक्ते नसरत राहिमी यांनी सांगितले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आत्मघातकी हल्ल्यात २ ठार

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील कंदाहार प्रांतातील एका आत्मघातकी हल्ल्यात दोन जण ठार झाल्याचे एका अफगाणी अधिकाऱ्याने सांगितले. एका आत्मघातकी बाँबरने स्वत:ला एका पोलीस वाहनाच्या पुढय़ात उडवून दिले. यात दोन नागरिक ठार, तर तीन पोलीस जखमी झाले, अशी माहिती कंदाहार प्रांतातील खासदार मोहम्मद नहिम इलाही यांनी दिली. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2018 4:06 pm

Web Title: atleast 17 dead several injured in kabul bomb blast
Next Stories
1 प्रजासत्ताकदिनी उत्तर प्रदेशात उसळलेला हिंसाचार दुसऱ्या दिवशीही कायम; जमावाने दोन बस पेटवल्या
2 मोदी सरकार खरंच लोकशाही पद्धतीने काम करते का?; रघुराम राजन यांचा सवाल
3 ‘पद्मावत’वाद : प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून प्रसून जोशींची माघार
Just Now!
X