बोको हरामच्या इस्लामी अतिरेक्यांनी सोमवारी नायजेरियाच्या ईशान्येकडील मैदुगुरी शहरावर रॉकेटच्या तसेच अनेक आत्मघातकी हल्लेखोरांच्या सहायाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान ३० जण ठार झाले आहेत.
दावारी या दूरच्या खेडय़ानजीक अतिरेक्यांनी तीन मालमोटारींच्या आडून अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर सैनिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. लोक बाहेर पळू लागल्यानंतर एक महिला ‘बोको हराम’च्या घोषणा देत त्या भागात गेली. लोक गोळा झाले, तेव्हा तिने स्वत:ला उडवून दिले.
गेल्या अनेक महिन्यांत प्रथमच झालेल्या या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नायजेरियन सैन्यांनी १० आत्मघातकी बॉम्बर्सना अडवून त्यांना संपवले व हल्लेखोरांना परतवून लावले, असे सरकारी बातम्यांचा प्रसार करणाऱ्या पीआर नायजेरिया या संस्थेने सांगितले.
सोमवारी हल्ला करण्यात आलेले मैदुगुरी हे बोको हरामचे जन्मस्थान आहे. २००९ साली नायजेरियन सुरक्षा दलांनी या संघटनेच्या परिसरावर सर्वशक्तिनिशी केलेल्या हल्ल्यात ७०० लोक मारले गेले होते.