News Flash

पत्नीचं डेबिट कार्ड पती वापरु शकत नाही: न्यायालय

राजेश कुमार यांनी एसबीआयच्या एटीएम केंद्रातून २५ हजार रुपये काढले. त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. पण प्रत्यक्षात मशिनमधून पैसेच बाहेर आले नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

स्वत:चं डेबिट कार्ड पती-पत्नी, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींना वापरु देणाऱ्यांना दणका देणारा निर्णय बंगळुरुमधील न्यायालयाने दिला आहे. बँकेच्या नियमांनुसार एटीएम कार्डचे हस्तांतरण करता येत नाही. त्यामुळे एटीएम कार्डचा वापर संबंधित खातेधारकांशिवाय अन्य कुणीही करणं अयोग्य असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. बँकेचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली आहे.

बंगळुरुत राहणाऱ्या वंदना या नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसूती रजेवर होत्या. वंदना यांनी त्यांच्या डेबिट कार्डचे पिन पती राजेश कुमार यांना दिले. त्यांनी घराजवळील एसबीआयचे एटीएम केंद्र गाठले आणि तिथून २५ हजार रुपये काढले. त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. पण प्रत्यक्षात मशिनमधून पैसेच बाहेर आले नाही. इथूनच या दाम्पत्याचा मनस्ताप सुरु झाला.

सुरुवातीला दाम्पत्याने कस्टमर केअरला फोन करुन याबाबतची माहिती दिली. तिथून त्यांना पैसे परत मिळतील, असे सांगण्यात आले. पण पैसे मिळत नसल्याने त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ‘कार्डाचे हस्तांतरण करता येत नाही. ते कार्ड एटीएम केंद्रात गेलेल्या व्यक्तीचे नव्हते. त्यामुळे पैसे परत मिळणार नाही’ असे बँकेने सांगितले. बँकेने दाम्पत्याला नियमावलीही दाखवली. गर्भवती असल्याने मला एटीएम केंद्रात जाणे शक्य नव्हते, असे वंदना यांनी बँकेला सांगितले. पण बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. शेवटी हे प्रकरण ऑक्टोबर २०१४ मध्ये ग्राहक न्यायालयात पोहोचले. बँकेने २५ हजार रुपये परत करावे. मी गर्भवती असल्याने बँक किंवा एटीएम केंद्रात जाऊ शकत नव्हते. म्हणूनच पतीला डेबिट कार्ड दिले, असे वंदना यांनी सांगितले.

या दाम्पत्याने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. तसेच माहिती अधिकारांतर्गत एटीएम मशिनमधील रोकडसंदर्भातील माहिती देखील मिळवली. एटीएम मशिनमध्ये २५ हजार रुपये अतिरिक्त असल्याचे यातून समोर आले. हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. बँकेने न्यायालयातही डेबिट कार्डासंदर्भातील नियमावलीचा दाखला दिला. एटीएम कार्डाचे हस्तांतरण होत नाही, कार्ड आणि पिन दुसऱ्याला देणे नियमात बसत नाही आणि त्यामुळे या याचिकेला अर्थच नाही, असे बँकेने न्यायालयात सांगितले. बँकेनेही हा युक्तिवाद ग्राह्य धरला. महिलेने तिच्या पतीला डेबिट कार्डऐवजी सेल्फ चेक दिला पाहिजे होता, असे न्यायालयाने नमूद केले आणि महिलेची याचिका फेटाळली. त्यामुळे पतीला कार्ड देणे हे या महिलेला आता चांगलेच पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:45 pm

Web Title: atm card non transferable sbi husband cant use wifes debit card benglauru consumer court
Next Stories
1 घोड्याचं इंजेक्शन देऊन ३ वेळेस केला बलात्कार, माजी मंत्र्याच्या नोकराचा खळबळजनक खुलासा
2 जो सन्मान दलाई लामांना तो शंकराचार्यांना नाही: शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती
3 घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा सैन्याच्या गस्तीपथकावर हल्ला; ४ जवान जखमी