सध्या देशभरात एटीएममध्ये पैसे नसल्याने आधीच वाद सुरु असताना आता सामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. एटीएम ऑपरेटर्सनी एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी जास्त चार्ज लावला जावा अशी मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या नव्या नियमावलीचं पालन करण्यासाठी ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सध्या सर्व बँका पाचपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास १५ रुपये चार्ज करतं. पण जर मागणी मान्य झाली तर दुसऱ्या बँकांचं एटीएम वापरल्यास जास्त चार्ज लागू शकतो.

कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) एटीएममधून पैसे काढल्यास लागणारा चार्ज किमान तीन ते पाच रुपयांपर्यंत वाढवला गेला पाहिजे अशी मागणी केली आहे. यामुळे एटीएम ऑपरेटर्सला आपला खर्च काढणं सोपं जाईल. ‘नुकतंच आरबीआयने काही कडक नियम जारी केले आहेत, ज्यामुळे एटीएम सर्व्हिस प्रोवायडर्सच्या एकूण खर्चात वाढ होणार आहे’, अशी माहिती सीएटीएमआयचे श्रीनिवास यांनी दिली आहे.

आरबीआयने बँकांना जुलैपर्यंत कॅश मॅनेजमेंटसंबंधी नवे नियम लागू करण्याचा आदेश दिला आहे. आरबीआयने केलेल्या नियमानुसार कॅशव्हॅनसाठी कॅश मॅनेजमेंट कंपन्यांकडे कमीत कमी 300 कॅश व्हॅन, प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, दोन बंदुकधारी आणि दोन कर्मचारी असावेत असं सांगण्यात आलं आहे.

याशिवाय प्रत्येक गाडीत जीपीएस, भू मॅपिंग, जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता असायला हवं. हा सर्व खर्च बँकांना न परवडणारा आहे. त्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे