सिक्किम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून युद्धचर्चेचे मोहोळ उठले असतानाच चीनकडून विविध माध्यमांतून धमक्या दिल्या जात आहेत. त्यात आता चीननं विसंवादाचा मार्ग अवलंबला आहे. उभय देशांमधील सध्याचे ताणलेले संबंध पाहता चर्चेसाठी वातावरण पोषक नसल्याचं कारण देत जर्मनीतील जी-२० परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. तशी शक्यताही नाही, असं चीननं म्हटलं आहे.

जर्मनीत हॅम्बर्ग शहरात जी-२० परिषद सुरू होणार आहे. या परिषदेत शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अध्यक्ष शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय चर्चेसाठी पोषक वातावरण नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यानं सांगितलं. दरम्यान सिक्किम परिसरात भारतीय सैन्याच्या आक्रमक धोरणामुळं चीनचा तिळपापड झाला आहे. भारतीय लष्करानं तेथे चीनद्वारे तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याचं बांधकाम रोखलं होतं. त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळं युद्धचर्चेचे मोहोळ उठलेले आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी सांगितले की, ‘जी-२० परिषदेत जर भेटीचा कार्यक्रम असेल तर त्याबाबत योग्य वेळी सांगण्यात येईल. पण मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चांबाबत म्हणाल तर सध्याचं वातावरण पाहता अशी चर्चा होणं अशक्य आहे.’ भारतानं तत्काळ डोकलाममधून आपलं सैन्य मागे घ्यावं. त्यामुळं भारत आणि चीन सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी काही पूर्वअटी आहेत, असंही जेंग शुआंग यांनी स्पष्ट केलं आहे.