जागतिक समुदायाने इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाविषयी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. तीन आठवडय़ानंतर या वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या असून सात महिन्यात तोडगा काढण्याचे ठरवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांचे पाच स्थायी सदस्य देश या चर्चेत सहभागी आहेत.

लाडली लक्ष्मीचा लाभ
भोपाळ : मध्यप्रदेश सरकारने राबवलेल्या लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ १८.६२ लाख मुलींना झाला असून त्यांच्या नावाने ४५०० कोटी रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मुलींचे भवितव्य घडवण्यासाठी ही योजना राबवली जाते असे मध्यप्रदेश सरकारने म्हटले आहे. या योजनेनंतर १६ लाख कुटुंबानी कुटुंबनियोजनही केले आहे.

देशातील श्रीमंत खेडे
वडोदरा: केरळ राज्यात अनिवासी भारतीयांचे ९०००० कोटी गुंतवलेले असल्याने अनिवासी भारतीयांच्या गुंतवणुकीत ते राज्य पुढे आहे. परंतु गुजरातमध्ये धरमाज या एका खेडय़ात अनिवासी भारतीयांची १००० कोटींची बँक ठेवीतील गुंतवणूक आहे. हे खेडे आणंद जिल्ह्य़ात असून त्याची लोकसंख्या ११३३३ पण बँका मात्र १३ आहेत. ते देशातील श्रीमंत खेडय़ांपैकी एक मानले जाते. येथील १७०० कुटुंबे ब्रिटनमध्ये तर  ३०० कुटुंबे अमेरिकेत स्थायिक आहेत. येथील पाटीदार समाजाची तीन हजार कुटुंबे राजेशाही थाटात जगतात.

अनुदान थांबवलेले नाही
नवी दिल्ली: श्रीमंतांचे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान थांबवण्याचा कुठलाही विचार नाही असे तेल मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राज्यसभेत सांगितले. सध्यातरी अशी कुठली योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी कंपन्यांनी काही लोकांना अनुदानित गॅस परत देऊन बाजार दराने गॅस घ्यावेत, असा पर्याय दिल्याचे वृत्त आले त्यावर त्यांनी हा खुलासा केला. काही कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने गॅस अनुदान नाकारले आहे त्यात १२४७१ कुटुंबाचा समावेश आहे.
सुनील वैद यांचे निधन
नवी दिल्ली: भाजपचे वरिष्ठ नेते आणि त्रिलोकपुरीचे माजी आमदार सुनील वैद (वय ४७) यांचे येथील खासगी रुग्णालयात बुधवारी निधन झाले. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या ८ डिसेंबर रोजीच्या सभेत भाषण करताना वैद चक्कर येऊन व्यासपीठावरच कोसळले होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती बुधवारी पहाटे अधिकच ढासळली. सकाळी ११.३०च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी दिली.

ग्रीनपीसला दंडाची शिक्षा
माद्रिद: अणुप्रकल्पाच्या विरोधात हिंसक निदर्शने करून नुकसान केल्याच्या प्रकरणी स्पेनच्या एका न्यायालयाने ग्रीनपीस संस्था व त्यांच्या १६ कार्यकर्त्यांना २५ हजार डॉलर दंड केला आहे. इतर काही गंभीर आरोपातून मात्र त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
पूर्वेकडील व्हॅलेनिशिया शहरातील न्यायालयाने कार्यकर्त्यांबरोबर असलेल्या छायाचित्रकारावरील सर्व आरोप रद्दबातल केले. फेब्रुवारी २०११ मध्ये अणुप्रकल्पाच्या विरोधात ग्रीनपीसने निदर्शने केली होती त्याबाबतच्या खटल्यात काल हा लेखी निकाल देण्यात आला.
निदर्शकांनी कोफ्रेनटेस येथील प्रकल्पात घुसून मोडतोड केली होती. स्पेनच्या इबेरडोला या ऊर्जा कंपनीचा हा प्रकल्प आहे. १५ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांनी तेथे घुसून न्यूक्लीयर डेंजर असे काळ्या अक्षरात कुलिंग टॉवर खाली लिहिले.
व्हॅलेनिशिया शहरात महिनाभर हा खटला चालला त्यात गुन्हेगारी स्वरूपाची हानी पोहोचवणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, दोन सुरक्षा जवानांना प्रकल्पस्थळी जखमी करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयाने काल असा आदेश दिला.