पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान करीत असलेल्या क्रूर अत्याचारांचा पर्दाफाश करणारी दृश्यफित प्रसारित झाली असून त्यात पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा खरा चेहरा उघड झाला आहे असे भारताने म्हटले आहे. ही दृश्यफित बनावट असल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला आहे. हा भारतीय माध्यमांचा खोटा प्रचार असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तान प्रत्येक बाबतीत भारताला दोष देतो, पण कॅमेरा खोटे बोलत नाही. चित्रफितीतली दृश्ये खरी आहेत. या आठवडय़ात ही दृश्यफित समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित झाली असून त्यात पाकिस्तानी सैन्यदले ही पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद व गिलगीट, कोटली येथे सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांवर अत्याचार करताना दिसत आहेत. पाकिस्तानी लष्कर व आयएसआया यांचा बुरखा फाडला गेला आहे आता जगानेच ते पहावे व तेथील भयानक अत्याचारांची कहाणी जाणून घ्यावी. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाज चौधरी यांनी सांगितले की, हा भारताचा खोटा प्रचार आहे. पाकिस्तानने काश्मीरींसाठी आवाज उठवला आहे, काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकताना जगाने पाहिले आहे. भारताच्या प्रचारकी कृत्यांना आमच्याकडे उत्तर नाही. काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकल्याने त्या लोकांना आम्ही राजकीय, राजनैतिक पाठिंबा देत आहोत.