पॅरिसमध्ये लुव्र कला संग्रहालयाजवळ गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानावर एका तरुणाने चाकूहल्ला केल्याने खळबळ माजली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारापूर्वी त्या तरुणाने ‘अल्ला हू अकबर’ असा नारा दिल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. संशयित हल्लेखोराकडे दोन बॅग सापडल्या आहेत. हा संशयित कोण होता, हल्ला करण्याचा त्याचा इरादा होता का हे अद्याप अस्पष्ट आहे.

पॅरिसमध्ये सुप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाच्या परिसरात एका तरुण संशयास्पदस्थितीमध्ये फिरत होता. त्याने संग्रहालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच जवानाने त्याला रोखले. यानंतर त्या तरुणाने चाकू काढून जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात जवान किरकोळ जखमी झाला. तर जवानाने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारापूर्वी त्या तरुणाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्याने घटनास्थळी खळबळ माजली होती. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने लुव्र संग्रहालय आणि सभोवतालचा परिसर रिकामा करत चारही बाजूंनी वेढा घातला. घटनास्थळी सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरु केली असून आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त ‘डेली मेल’ या स्थानिक प्रसारमाध्यमाने दिले आहे. मात्र त्या व्यक्तीचा या हल्ल्याशी संबंध आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘लुव्र संग्रहालयाच्या परिसरात सध्या शोधमोहीम सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर घटना आहे’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली आहे. हल्लेखोराने केलेली घोषणाबाजी ऐकून त्याला दहशतवादी हल्ला घडवायचा होता असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हल्लेखोराकडे सापडलेल्या दोन बॅगांची पोलिसांनी तपासणीही केली. मात्र त्यात स्फोटक पदार्थ सापडले नाही असे पोलिसांनी सांगितले.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लुव्र संग्रहालय हे पर्यटकांमध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. या संग्रहालयात जगभरातील सर्वात महागड्या चित्रांचा संग्रह आहे. मनोहारी कलासंग्रहालय बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. गेल्या दोन वर्षात इसिस या दहशतवादी संघटनांनी फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले घडवल्याने देशातील सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे.