पश्चिम बंगालचे मंत्री जाकीर हुसेन यांच्यावर करण्यात आलेला बॉम्बहल्ला हा एका कटाचा भाग असल्याचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. हुसेन यांच्यावर काही जण पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बॅनर्जी यांनी एसएसकेएम रुग्णालयात जाऊन हुसेन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तेव्हा त्यांनी रेल्वेच्या कारभारावर सडकून टीका केली. जाकीर हुसेन यांच्यावरील हा पूर्वनियोजित हल्ला होता, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बॉम्बस्फोट रिमोट कंट्रोलद्वारे घडविण्यात आल्याचा दावा काही जणांनी केला आहे. हा एका कटाचा भाग आहे, हुसेन यांनी अन्य पक्षामध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर काही महिन्यांपासून दबाव आणला जात आहे, याबाबत तपास सुरू असल्याने आपण अधिक भाष्य करणार नाही, असे बॅनर्जी यांनी वार्ताहरांना सांगितले.

हुसेन नेमके कोठे आहेत याची हल्लेखोरांना माहिती होती आणि ते त्यांचा पाठलाग करीत असावेत, या प्रकरणाचा तपास केवळ गुन्हा अन्वेषण विभागच करणार नाही तर त्यांना विशेष कृती दल (एसटीएफ) आणि घुसखोरीविरोधी दल (सीआयएफ) सहकार्य करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

या स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना बॅनर्जी यांनी पाच लाख रुपयांची, तर किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. हल्ला रेल्वे स्थानकावर करण्यात आला असताना सुरक्षेतील त्रुटीची जबाबदारी रेल्वे कशी नाकारू शकते, असा सवालही ममतांनी केला. हल्ल्याच्या वेळी स्थानकावर सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते, असेही त्या म्हणाल्या. स्थानकावर दिवे नव्हते, पूर्ण अंधार होता, रेल्वे पोलीस काय करीत होते, असेही त्या म्हणाल्या.

‘प्रथम अभिषेकविरुद्ध लढा..’

पैलन (पश्चिम बंगाल) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या दीदी-भतिजा टीकेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. गृहमंत्र्यांनी प्रथम आपला भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी आणि त्यानंतर आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचा विचार करावा, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी शहा यांना दिले.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील पैलन येथे एका जाहीर सभेत बॅनर्जी म्हणाल्या की, अभिषेक यांना खासदारच व्हावयाचे असते तर त्यांनी राज्यसभेचा सहज मार्ग स्वीकारला असता, परंतु त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आणि मोठा जनाधार मिळविला. अमित शहा अहोरात्र दीदी-भतिजाचा जप करीत असतात, प्रथम अभिषेक यांच्याविरुद्ध निवडणूक लढा आणि त्यानंतर आपल्याविरुद्ध, असे ममतांनी म्हणताच समर्थकांनी जल्लोष केला.