उधमपूरमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला करणाऱ्या सहा जणांविरुद्ध आरोपपत्र तयार करण्याचे आदेश सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दिले. या सहा जणांमध्ये पाकिस्तानचा नागरिक मोहम्मद नावेद याचाही समावेश असून त्याला जिवंत पकडण्यात आले आहे. एनआयएने २५ जानेवारी रोजी नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सदर दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचे कृत्य असल्याचा आरोपही करण्यात आला. नावेदने अबू नोमन याच्यासह सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर उधमपूरमध्ये हल्ला केला. त्यामध्ये दलाचे दोन अधिकारी ठार झाले, तर १३ जण जखमी झाले. नावेद याच्यासह खुर्शीद अहमद बट, शौकत अहमद बट, शबझार अहमद बट, फयाज अहमद इट्टू आणि खुर्शीद अहमद इट्टू यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.