इराणच्या अहवाज शहरात शनिवारी सकाळी लष्करी संचलनावर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात इराणी लष्कराचे आठ सैनिक ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नागरिकांचा समावेश आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे.

हल्लेखोर लष्करी गणवेशात आले होते. त्यांनी संचलन सुरु असताना एका पार्क जवळून गोळीबार केला. एकूण चार हल्लेखोर होते. त्यापैकी दोन हल्लेखोर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत मारले गेले तर दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या या गोळीबारामुळे घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अद्यापपर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मागच्यावर्षी इराणच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतरचा हा अशा प्रकारचा दुसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यामागे सुन्नी दहशतवादी असल्याचा आरोप इराणमधील प्रसारमाध्यमांनी केला आहे. मागच्यावर्षी अहवाज शहरात सरकार विरोधात मोठया प्रमाणाव निदर्शने झाली होती.