मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयावर युवकांच्या गटाने हल्ला केला. तोडफोडप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर भाजप व संघाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप माकपने केला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात अफजल गुरूच्या फाशीविरोधातील कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी कार्यालयावर दगडफेक केल्याचा दावा माकपने केला आहे. ताब्यात घेण्यात आलेला कार्यकर्ता आम आदमी सेनेचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्यालयात तीन कार्यकर्ते आले. त्यांनी काळी शाई फेकली. त्यात दोन कार्यकर्ते पसार झाले व एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचे नाव सुशांत खोसला असून, आम आदमी सेनेचा तो कार्यकर्ता आहे. माकपला देशद्रोही ठरवण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे. संघाने आम्हाला देशभक्ती शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला.